डॉल्बी साऊंड सिस्टिम व लेझर ला शिवजयंतीला बंदी असावी संपूर्ण महाराष्ट्रत
*महाराज, क्षमा असावी!!*आपल्या जयंतीनिमित्ताने चाललेली कर्ण कर्कश्य आवाजामध्ये DJ नाच-गाणी पाहिली आणि तळपायाची आग मस्तकात गेली. असं वाटलं की आपण मोगलाईमध्येच आहोत. शिवनेरी किल्ल्यावर पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या व प्लॅस्टिकचे चहाचे कप इकडे-तिकडे टाकणारे, फाटलेला सायलेन्सर लावून फडफड आवाज करणाऱ्या दुचाकी बेशिस्त पद्धतीने चालून ट्रॅफिक जॅम करणारे, महाराजांच्या दर्शनासाठी रांग मोडणारे, DJ डॉल्बी साऊंड सिस्टिम वर नाचून धिंगाणा करणारे हे शिवाजी महाराज यांचे सच्चे मावळे असे असूच शकत नाही. यांनी एक जरी गुण महाराजांचा अंगी बाणवला असता तर असे राक्षसी पद्धतीने शिवजयंती साजरी झाली नसती. शिवाजी महाराजांच्या मूर्ती पुढे दारू पियुन , गुटखा खाऊन तुम्ही नाचताय. अशा पद्धतीने शिवजयंती साजरी करून काही समाजकंटक शिवजयंतीला कलंक लावत आहे.
छत्रपती महाराजांची शिकवण आणि विचार सर्व पायदळी तुडवून आसुरी पद्धतीने शिवजयंती साजऱ्या करणाऱ्या लोकांना शरम वाटली पाहिजे. यांना महाराजांचे मावळे म्हणजे म्हणणे हा महाराजांच्या मावळ्यांचा अपमान आहे. डीजे लावून श्रीवल्ली, बांगो, ओ शेठ आणि अल्ला मियाँ ऐकले आम्ही. पोवाडे सोडून सर्व भिकार गाणी लावून मुक्तपणे नाचणाऱ्या व्यसनाधीन टाळक्यांना शिवविचार हे कळलेच नाही कधी. यांना सहकार्य करणाऱ्या राजकीय लोकांना शिवजयंती ही पारंपरिक पद्धतीने साजरी करावी ही विनंती.
महाराजांनी बारा मावळ्यातली लोकं एकत्र करून स्वराज्य निर्माण केले होते आणि येथे एकाच ठिकाणचे तीन ते चार मंडळ एकत्र येऊ शकत नाही. यांना काय समजणार शिवविचार?
Dj डॉल्बी साऊंड सिस्टिम वर्गणी मागून पैसे जमा करण्यापेक्षा ती ऊर्जा अन तो पैसा गरिबांना मदत करण्यासाठी वापरा, अपंगांना सहाय्य करा, रुग्णांची सेवा करा, झाडे लावा, रक्तदान करा, किल्ले स्वच्छ करा. हीच खरी शिवजयंती आहे.
लक्षात ठेवा ही शिवजयंती आहे - कुठल्याही राजकीय नेत्याचे किंवा गल्लीबोळातल्या व्यक्तीचा वाढदिवस किंवा विसर्जन मिरवणूक नाही. डीजे डॉल्बी साऊंड सिस्टिम व लेझर मुळे अनेक जण अधू होतात त्याचबरोबर पशु पक्षांना भयानक त्रास होतो. माझा हेतू कोणाला दुखवायचा किंवा कुठल्या राजकीय पक्षाला विरोध नाही.
कट्टर शिवभक्त शिवचरित्राला धक्का लागेल असे कुठलीही गोष्ट कधीच करत नाही. शिवजयंती पारंपारिक पद्धतीने करावी आणि दिखावा करू नका ही विनंती.
संपूर्ण महाराष्ट्रात डॉल्बी साऊंड सिस्टिम व लेझर शिवजयंतीला बंदी असावी

*योगेश सोनावणे*, पुणे.
20 फेब्रुवारी 2024.
9552304595